Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध करा ; दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र.
प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करून सिंचनासाठी पाणी उपसा करण्यास वेळेत परवानगी द्या; जलसंपदा आणि भूजल विभागाशी समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्याची आग्रही मागणी.
चंद्रपूर : दुष्काळाचे संकट गडद होत असताना शेतकऱ्यांच्या शिवारात हिरवाई फुलावी, त्यांच्या कष्टांना पाण्याचा आधार मिळावा आणि रब्बी हंगामातील पिके सिंचनाअभावी करपून जाऊ नयेत, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी नदी क्षेत्रातील उपलब्ध पाणी सिंचनाकरिता वापरण्याची परवानगी द्यावी, तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा क्षेत्रापासून ५०० मीटर अंतराच्या निकषामुळे अडचणीत येणाऱ्या बोअरवेलधारक शेतकऱ्यांना लागू नियमांनुसार आवश्यक सवलती द्याव्यात, अशी मागणी आ.मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. शेतकऱ्यांच्या घामातून उभ्या राहणाऱ्या शेतीला पाण्याचा आधार मिळावा आणि दुष्काळाच्या झळांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये आणखी भर पडू नये, ही या मागणीमागील भूमिका आहे.
अनियमित पाऊस आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर रब्बी हंगामातील पिके घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. खरीप हंगामातील अडचणींचा सामना केल्यानंतर रब्बीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध न झाल्यास त्यांच्या आर्थिक संकटात भर पडू शकते. एका बाजूला नदीतून उपलब्ध पाणी वाहून जात असताना दुसऱ्या बाजूला सिंचनाअभावी शेतकऱ्यांच्या पिकांवर संकट ओढवणे, ही परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध जलस्रोतांचा नियोजनबद्ध वापर करण्याची गरज आमदार मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली आहे.
नदी क्षेत्रातील उपलब्ध पाणी रब्बी पिकांच्या सिंचनासाठी वापरण्याची परवानगी देताना आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुलभ कराव्यात आणि पाणी उपशासाठी शेतकऱ्यांना वेळेत परवानगी मिळेल, याची दक्षता घ्यावी, अशी आ.मुनगंटीवार यांची मागणी आहे. तसेच शेतात बोअरवेल असलेल्या आणि सार्वजनिक पाणीपुरवठा क्षेत्रापासून ५०० मीटर अंतराच्या निकषामुळे अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लागू नियमांच्या चौकटीत आवश्यक सवलती द्याव्यात, असेही त्यांनी नमूद केले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीही विविध मागण्या शासनदरबारी मांडल्या आहेत. धान उत्पादकांना बोनस मिळावा, शेतमालाच्या हमीभावाने खरेदीसाठी केंद्रांची व्यवस्था व्हावी, कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा मिळावा आणि नैसर्गिक संकटांच्या काळात शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळावी, अशा विषयांवर त्यांनी सातत्याने भूमिका घेतली आहे. आता रब्बी हंगामातील सिंचनाचा प्रश्न उपस्थित करून आ.मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
शेतकऱ्यांसाठी शेती हा केवळ व्यवसाय नसतो; ती त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची, मुलांच्या भविष्याची आणि वर्षभराच्या आशा-अपेक्षांची जीवनवाहिनी असते. पावसाच्या लहरीपणामुळे पिके धोक्यात आली की त्यामागे केवळ उत्पादनाचे नुकसान नसते, तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावर त्याचा परिणाम होतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आ.मुनगंटीवार यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.नदीतील पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून देताना सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची गरज, जलसाठ्याची स्थिती आणि भूजल पातळी यांचा समतोल राखावा. जलसंपदा विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि संबंधित पाणीपुरवठा यंत्रणांनी परस्पर समन्वयातून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दुष्काळाच्या या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांची नव्हे, तर वेळेत मिळणाऱ्या पाण्याची आणि ठोस प्रशासकीय निर्णयांची गरज आहे.रब्बी हंगाम सुरू असतानाच या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: