Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
आमदार मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना पाठविले पत्र.

केवळ ५ हजार क्विंटल उद्दिष्ट अपुरे; आमदार मुनगंटीवार यांची १ लाख क्विंटलपर्यंत वाढ करण्याची मागणी. चंद्रपूर : जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवत हंगाम २०२५-२६ (रब्बी) मधील मका खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील उत्पादनाच्या तुलनेत शासनाने निश्चित केलेले केवळ ५ हजार क्विंटलचे उद्दिष्ट अत्यंत अपुरे असल्याने ते वाढवून किमान १ लाख क्विंटल करण्यात यावे, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली आहे. पत्रात आमदार मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात २०२२ शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केली असून मोठ्या प्रमाणावर मका उत्पादन होणे अपेक्षित आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार जवळपास १ लाख ६२ हजार ८३८ क्विंटल उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या तुलनेत शासनाने निश्चित केलेले उद्दिष्ट अत्यंत कमी आहे. सध्याचे उद्दिष्ट कायम राहिल्यास अनेक शेतकऱ्यांना त्यांचा मका खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात विकावा लागण्याची शक्यता असून त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते, अशी चिंता आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही आमदार मुनगंटीवार यांनी केली आहे. शेतकरी हितासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा मका उत्पादकांच्या प्रश्नाला प्राधान्य देत शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नुकतेच पोंभूर्णा येथे मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, आता मका खरेदीच्या अपुऱ्या उद्दिष्टाचा मुद्दाही त्यांनी प्रभावीपणे पुढे आणला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केवळ भूमिका मांडण्यापेक्षा त्यावर प्रत्यक्ष कृती आणि पाठपुरावा करण्याची आमदार मुनगंटीवार यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, त्यांच्या या पुढाकारामुळे जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: