विधानसभेत सुधीर मुनगंटीवारांची जोरदार मागणी अर्थसंकल्पात घोषणेची अपेक्षा.
वनमंत्री गणेश नाईक यांचे सभागृहात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन, मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश.
चंद्रपूरच्या सागवान वारशाला मिळणार नवे दालन.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे जागतिक दर्जाचे टिम्बर म्युझियम – झायलेरियम उभारण्याच्या मागणीला आता ठोस गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून हा विषय प्रभावीपणे मांडत बल्लारपूर येथे टिम्बर म्युझियम – झायलेरियम स्थापन करण्याची मागणी सभागृहात ठामपणे मांडली.
या चर्चेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेत हे म्युझियम उभारले जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीवर जणू शिक्कामोर्तब झाल्याची भावना व्यक्त होत असून उद्या सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री या प्रकल्पाबाबत घोषणा करतील का, याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुनगंटीवारांच्या पत्रावर प्रत्यक्ष भेटीत सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश दिले त्यामुळे याबाबतची रूपरेषा स्पष्ट झाली आहे.
विधानसभेत मंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनांचा सातत्याने पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात पूर्ण करून घेण्यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हातखंडा मानला जातो. विरोधी पक्षात असतानाही त्यांनी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करून अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाकडून करून घेतले होते. त्यामुळे बल्लारपूर येथे टिम्बर म्युझियम – झायलेरियम उभारणीच्या मागणीबाबत देखील ते निश्चितच यशस्वी ठरतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
विधानसभेत या विषयावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकडाची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परंपरा अधोरेखित केली. वनमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील उत्कृष्ट दर्जाच्या सागवानाचा उपयोग देशातील अनेक प्रतिष्ठित वास्तूंसाठी करून दिला होता. अयोध्या येथील श्रीराम मंदिर, नवी दिल्लीतील नवीन संसद भवन, भारत मंडप, पंतप्रधान कार्यालय तसेच केंद्रीय सचिवालय अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या वास्तूंमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सागवानाचा वापर करण्यात आल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: